बेळगावमध्ये मराठी नेत्यांना अटक करणे अयोग्य- देवेंद्र फडणवीस

खान्देश लाईव्ह I १९ डिसेंबर २०२२ I बेळगावमध्ये मराठी नेत्यांना अटक करणे अयोग्य आहे, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावात जाऊ दिले पाहिजे, असे म्हणत सीमावादावर सरकार पाठिशी असल्याचे आश्वासन दिले. शोकप्रस्तावानंतर अधिवेशनाचे कामकाज तहकूब करण्यात आले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोलावे. त्यांनी सीमावर्ती भागात ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना सोडायला लावावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केलीय. याप्रकरणी लक्ष घालून त्यांना तातडीने सोडायला लावू, असे उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. बोम्मई यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून केलेल्या चिथावणीखोर ट्वीट्सबाबत महाराष्ट्राची दिशाभूल केली जात असून, या गंभीर प्रकरणावर राज्य सरकार गप्प का आहे? असा सवाल माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पत्रकारांशी बोलताना त्यांनी या संपूर्ण प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला.
सभागृहात विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत सीमाप्रश्नावर बैठक झाली. त्या बैठकीत महाराष्ट्राविरोधात भूमिका न घेण्याचे आश्वासन बसवराज बोम्मई यांनी दिले होते. तरीही आज महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकात जाण्यापासून रोखले जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीनंतरही कर्नाटक सरकारची दडपशाही सुरुच आहे. कर्नाटकच्या या दादागिरीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीसांनी भूमिका स्पष्ट करावी.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम