बोर्डाकडून बारावीच्या ऑफलाईन परीक्षेचे नियमावली जाहीर
खान्देश लाईव्ह | ४ मार्च २०२२ | कोरोना संकट काहीसे कमी झाल्याने यंदा बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या या परीक्षेसाठी राज्यातील 9 हजार 635 परीक्षा केंद्रांवर 14 लाख पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
बारावीची परीक्षा आज इंग्रजी विषयाचा पहिला पेपर आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव कमी झाल्याने या परीक्षेत लिखाणासाठी विद्यार्थांना वेळ थोडा वाढवून मिळणार आहे. विद्यार्थ्यांना ऑफलाईन परीक्षेमध्ये 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी 30 मिनिटे, तर 40 ते 60 गुणांसाठी 15 मिनिटांची वेळ असे आयोजन महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून करण्यात आले आहे. शिक्षण मंडळाकडून परीक्षेसंदर्भात योग्य ती खबरदारी घेण्यात आली असून पूर्ण तयारी झाली आहे.
परिक्षेसाठी एका हाॅल मध्ये 25 विद्यार्थी असून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात बसण्यासाठी झिगझॅग पद्धतीने बसवण्यात येणार आहेत. विद्यार्थांच्या मनावर ताण येऊ नये, तयारीसाठी आणखी वेळ मिळावा म्हणून महत्त्वाच्या विषयांच्या पेपरमध्ये विचारपूर्वक अंतर ठेवण्यात आले आहे. कोरोनामुळे प्रत्येक शाळेत उपकेंद्र सुरू केले आहे. 15 पेक्षा जास्त विद्यार्थी असणार्या शाळांत उपकेंद्रे सुरू केली आहेत.
बारावीच्या परीक्षांमध्ये इतर परीक्षांप्रमाणे गैरव्यवहार टाळण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. परीक्षेदरम्यान काही गैरप्रकार घडू नये यासाठी संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी भरारी पथके, दक्षता समितींची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये विशेष महिला भरारी पथक आणि शिक्षण विभागातील विशेष अधिकारी सुद्धा वेळोवेळी परीक्षा केंद्रांना भेटी देणार आहेत.
परीक्षा केंद्र व उपकेंद्रांवर कोरोना नियमावलीचे पालन करून परीक्षा घेतल्या जाणार आहेत. परीक्षा काळात आजारी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. ज्यांना आजारपणामुळे परीक्षा देणे शक्य नाही. त्यांना जुलैमध्ये पुनर्पक्षेची सुविधा आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेला येताना कंपास, पेन, पट्टी व पाण्याची बाटली आणावी असे आवाहन जिल्हा शिक्षण विभागाने केले आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम