आज HSC परिक्षेला सुरूवात, विद्यार्थ्यांनी मार्गदर्शक तत्त्वांचे करावे पालन
खान्देश लाईव्ह | ४ मार्च २०२२ | गेल्या दोन वर्षाच्या कोरोना काळानंतर विद्यार्थी पहिल्यांदाच ऑफलाईन पद्धतीने पेपर देणार आहेत. परीक्षेच्या दृष्टीने जळगाव बोर्डासह परीक्षा केंद्राच्या ठिकाणी तयारी पूर्ण झाली आहे. आज इंग्रजी विषयाचा पहिला पेपर असणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी एक तास आधीच परीक्षा केंद्रावर येण्याची सूचना करण्यात आली आहे. तीन तासांच्या पेपरसाठी अर्धा तास अधिक वेळ देण्यात येणार आहे. ज्या शाळांत बारावीचे परीक्षा केंद्र असेल, त्या शाळांनी माध्यमिक मंडळाच्या सूचनेप्रमाणे नियोजन करण्याचीही सूचना आहे.
परीक्षेचे संचालन व गैरप्रकार टाळण्यासाठी एकूण 21 पथके गठीत करण्यात आली आहे. माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकार्यांचे प्रत्येक एक, निरंतर शिक्षणाधिकार्याचे एक, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था प्राचार्याचे एक, उपशिक्षणाधिकार्यांचे दोन, गटशिक्षणाधिकार्यांचे चौदा, महिला भरारी पथकाचा समावेश आहे. प्रत्येक केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात राहणार आहे.
परीक्षा केंद्रावर पाळल्या जाणाऱ्या मार्गदर्शक सूचना :
- विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर अनिवार्य COVID-19 मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले पाहिजे. तसेच त्यांच्या प्रवेशपत्रासोबत स्वतःचा फेस मास्क, हँड सॅनिटायझर बाळगण्याची सूचना देण्यात आली आहे.
- उमेदवारांना रिपोर्टिंग वेळेच्या 30 मिनिटे आधी परीक्षा केंद्रावर पोहोचणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य नेण्यास मनाई आहे. परीक्षा केंद्रात प्रवेश करताना विद्यार्थ्यांची झडती घेतली जाईल आणि कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणाला परवानगी दिली जाणार नाही.
- परीक्षा केंद्रामध्ये बंदी घालण्यात आलेल्या वस्तूंमध्ये मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक उपकरण, हेडफोन आणि इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक गॅझेटचा समावेश आहे.
- प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकेवर दिलेल्या सर्व सूचना वाचा.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम