वीज कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या आरोपीस तीन वर्षे सश्रम कारावास

बातमी शेअर करा

जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

खान्देश लाईव्ह | २४ नोव्हेंबर २०२२ | वीजबिल वसुलीसाठी गेलेले महावितरणच्या कर्मचाऱ्याना मारहाण करून शिवीगाळ केल्या प्रकरणातील आरोपीला दोषी ठरवत अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाने दंड व तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

अमरावती येथील विश्वनाथ कॉलनीमध्ये राहणारे गणेश बळीराम तळोकार (५२) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असुन ही घटना ऑक्टोबर २०१८ मध्ये अमरावतीतील फरशी स्टॉपस्थित टांक बाजार परिसरात घडली होती. दि.१० ऑक्टोबर २०१८ रोजी राजापेठस्थित वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील वरिष्ठ तंत्रज्ञ गोपाल काशीराम माहुलकर हे थकीत वीजबिल वसुलीचे काम करत होते. दरम्यान, ते टांक बाजार येथे प्रकाश बळीराम तळोकार यांच्या दुकानात वीजबिल थकल्याने वसुलीकरिता गेले असता, तेथे उपस्थित प्रकाश तळोकार यांचा भाऊ आरोपी गणेश तळोकार यांना तुम्ही वीजबिल भरले नाही तर तुमचे वीज कनेक्शन बंद करण्यात येईल असे म्हटले. त्यावेळी गणेश तळोकार यांनी वाद घालून गोपाल माहुलकर यांना अश्लील शिवीगाळ केली आणि लोखंडी पाईपने मारण्याचा प्रयत्न केला.

 

तसेच त्यानंतर त्याने माहुलकर यांना थापड मारून त्यांची कॉलर पकडली. घटनेनंतर माहुलकर हे जखमी झाले आणि घटनेची तक्रार राजापेठ पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम ३५३,३३२,,५०४ आणि १८६ भां.द.वि.नुसार गुन्ह्याची नोंद केली होती.

तपासाअंति तपास अधिकारी पोलिस निरिक्षक दत्ता नरवाडे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील रंजीत ना.भेटाळू यांनी युक्तिवाद करत न्यायालयात एकूण सात साक्षीदार तपासले. दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक ३ मा. रवींद्र व्ही. ताम्हाणेकर यांच्या न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत भां.द.वि.च्या कलम ३५३ नुसार दोन वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास,तसेच कलम ३३२ भां.द.वि. नुसार ३ वर्ष सश्रम कारावास व ३ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास व कलम १८६ भां.द.वि. नुसार ३ महिने सश्रम कारावास व ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास सात दिवस अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली.

 

सदर प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून पोलीस मुख्य हवालदार बाबाराव मेश्राम व एनपीसी अरुण हटवार , सतीश चौधरी यांनी पोलीस विभागाकडून काम पाहिले.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like