उप प्रादेशिक परिवहन कार्यालय जळगाव  यांनी 2021-2022  या आर्थिक वर्षात  132.65  कोटी महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण

बातमी शेअर करा

जळगाव  :  उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव यांनी २०२१-२२ या कालावधीत नविन वाहन नोंदणी, योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण, कच्ची व पक्की अनुज्ञप्ती, जुनी वाहन कर वसूली, अटकावून ठेवलेल्या वाहनांचा लिलाव, पर्यावरण कर वसूली, दोषी वाहन चालकांकडून दंड वसूली यांच्या माध्यमातून एकूण १३२.६५ कोटी महसूल वसूलीचे उद्दिष्ठ पूर्ण केलेले आहे. सन २०२१-२२ या कालावधीकरीता शासनाने या कार्यालयास १६३.८९ कोटीचे लक्षांक दिलेले होते. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर या कार्यालयाने लक्षांकाच्या ८१% महसूल वसूलीचे लक्षांक पूर्ण केलेले आहे. परंतु सन २०२०-२१ मध्ये या कार्यालयाकडून १०९-३८ कोटी इतकी महसूल वसूली करण्यात आलेली होती. म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेत २१%  ने महसूल वसूलीत वाढ झालेली आहे.

                सन २०२१-२२ या चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या काळात कोरोना महामारीची पार्श्वभूमी असतांना तसेच वाहनाची नोंदणी व रस्त्यावरील वाहतूकीचे प्रमाण कमी असतांना या कार्यालयाने रस्त्यावरील अंमलबजावणीच्या माध्यमातून दोषी वाहनधारकांविरुध्द वायुवेग पथकातील मोटार वाहन निरीक्षक यांनी मोठया प्रमाणात कारवाई करुन एकूण ५.११ कोटी दंड वसूली व २.३४ कोटी थकीत वाहन कर वसुलीचे उद्ष्टि पूर्ण केलेले आहे. मागील वर्ष सन २०२०-२१ या दरम्यान या कार्यालयातील वायुवेग पथकाव्दारे २.६८ कोटी तडजोड शुल्क वसूली व २.१३ कोटी थकीत कराची वसूली केलेली होती. म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी वायुवेग पथकामार्फत ९०% जास्त दंड वसूली करण्यात आलेली आहे.

                या कारवाईतंर्गत अवजड मालवाहू वाहनांतून ओव्हरलोडींग, मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक, योग्यता प्रमाणपत्र वैधता संपलेली वाहने, विमा प्रमाणपत्र व पीयुसी नसणे, वाहन चालकाकडे अनुज्ञप्ती नसणे, हेल्मेट परिधान न करणे, मोबाईलवर बोलणे, नियमबाह्य  प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी बसेस, सिट बेल्ट न बांधणे, अतिवेगाने वाहन चालविणे, खाजगी बसेसमधून मालाची वाहतूक करणे इत्यादी दोषी वाहनधारकांविरुध्द कारवाई करण्यात आलेली आहे.

                वायूवेग पथकाच्या कारवाईतंर्गत सन २०२१-२२ या दरम्यान एकूण ७९९ माल वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनधारकांविरुध्द कारवाई करण्यात येवून एकूण ३.६१ कोटी दंड वसूली  करण्यात आलेली आहे. या कारवाईतंर्गत अवैध प्रवास वाहतूक करणाऱ्या १४६१ दोषी वाहनधारक, नियमबाह्य  खाजगी बसधारक १३९, योगयता प्रमाणपत्र वैधता संपलेल्या एकूण १६९५ वाहनधारक, हेल्मेट परिधान न करणाऱ्या १७७८ दुचाकी चालक, मोबाईलवर बोलणारे ३०७ दुचाकी चालक, सिट बेल्ट न परिधान करणारे, २४३ कार चालक , दोषी ऑटोरिक्षाधरक ७०८, प्रवाशांची मालवाहू वाहनातून वाहतुक करणारे ४०१ मालवाहतूक चालक, वाहनांना मागील बाजूस रिप्लेक्टर नसणारे १२१७ व अतिजलद वेगाने  वाहन चालविणारे ५२२ वाहनचालक इत्यादी वाहनचालकाविरुध्द गुन्ह्याची नोंद करुन वसूली करण्यात आलेली आहे. सन २०२१-२२ या दरम्यान या कार्यालयातील वायुवेग पथकातील अधिकारी यांनी एकूण १२०४२ दोषी वाहनचालकाविरुध्द मोटार वाहन कायद्यातील विविध कलमांखाली गुन्हे नोंदविलेली आहेत. या कालावधीत दोषी वाहनचालकाविरुध्द कारवाई करतांना उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथील मोटार वाहन निरीक्षक आर,डी. निमसे, श्रीकांत महाजन, सुनिल गुरव, धीरज पवार, दिपक ठाकूर,संदीप पाटील, हेमंत सोनवणे, चंद्रविलास जमदाडे, नितीन सुर्यवंशी, नितीन सावंत, सौरभ पाटील, प्रशांत कंकरेज, अविनाश दुसाने, गणेश पिंगळे, जगदीश गुंगे, विनोद चौधरी, सुनिल ठाकूर यांनी कामकाज केले.

                २०२१-२२ या कालावधीत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथे एकूण ३६९३३ दुचाकी वाहनांची तर एकूण ५०१६ मोटार कार या नविन वाहनांची नोंदणी करण्यात आलेली आहे. या नविन वाहनांच्या नोंदणीतून जळगाव कार्यालयात एकूण ५६.९० कोटी एकरकमी वाहन कर प्राप्त झालेला आहे. तसेच मालवाहू व इतर नविन वाहनाच्या नोंदणीतून ४७.९१ कोटी  वाहन कर  वसूल करण्यात आलेला आहे.

                जळगाव जिल्ह्यच्या दृष्टीने महत्वाची गंभीर बाब म्हणजे रस्त्यावरील होणाऱ्या अपघात जखमी होणाऱ्या वाहनचालकांमध्ये जरी घट झालेली असल्याचे दिसून येत असले तरी वाहन अपघातामध्ये मृत्यू पावणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत लक्षणिय वाढ (११%) झाल्याचे दिसू येते. सन २०२१ या दरम्यान एकूण ७५२ रस्ता अपघातामध्ये ४७१ व्यक्ती मयत तर ५१४ व्यक्ती जखमी झालेले दिसून येते. तर सन २०२२ या दरम्यान एकूण ७८५ रस्ता अपघातामध्ये एकूण ५२५ व्यक्ती मयत तर ३९१ व्यक्ती जखमी झालेले आहेत. जळगाव जिल्ह्यातील रस्ते अपघातामध्ये प्रामुख्याने दुचाकी, अवजड मालवाहू वाहन व मोटार कार यांचा समावेश आहे. बरेचशे अपघात हे जलद वेगाने वाहन चालविणे, हेल्मेट परिधान न करणे व धोकादायक पध्दतीने ओव्हरटेक करणे इत्यादी कारणास्तव झाल्याचे दिसून येते.

                जिल्ह्यातील सर्व दुचाकी व चारचाकी वाहन चालक यांना आवाहन करण्यात येते की, महामार्गावर तसेच शहरात दुचाकी वाहन चालवितांना न चुकता हेल्मेट परिधान करावे, सर्व वाहन चालकांनी महामार्गावर विहीत केलेल्या वेग मर्यादेमध्ये वाहन चालवावे, लेन बदलवितांना व ओव्हरटेक करतांना विशेष काळजी घ्यावी. पंचायत रस्त्यावरुन महामार्गावर येतांना महामार्गावरील वाहनांना प्राधान्य देवूनच प्रवेश करावा. वाहन चालवितांना मोबाईलवर बोलणे टाळावे, दुचाकी चालकांनी दोन पेक्षा जास्त व्यक्तींनी दुचाकीवर प्रवास करु नये, पालकांनी अनुज्ञप्ती खेरीज पाल्यांना दुचाकी  चालविण्यास मज्जाव करावा, कार चालकांनी व प्रवाशांनी सिटबेल्टचा वापर करावा, परिवहन वाहनधारकांनी त्यांच्या वाहनांचे वेळोवेळी योग्यता प्रमाणपत्र  नुतनीकरण करुन घ्यावे, खाजगी प्रवासी बस चालकांनी त्यांच्या वाहनातून मालाची वाहतूक करु नये, प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांनी आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करु नये, याबाबत सर्व नागरिक / वाहन चालक यांना उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव यांच्या मार्फत आवाहन करण्यात येत आहे. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like