न आवडणाऱ्या स्पर्शाला संकोच न करता नकार द्या -डॉ. किर्ती देशमुख

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I ९ डिसेंबर २०२२ I शालेय विद्यार्थिनींनी चांगले स्पर्श आणि वाईट स्पर्श यातील फरक वेळीच समजून घेत न आवडणाऱ्या स्पर्शाला संकोच न करता नकार द्यायाला शिकावे असे आवाहन मानसोपचार तज्‍ज्ञ डॉ. किर्ती देशमुख यांनी केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने शुक्रवार दि. ९ डिसेंबर रोजी केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थिंनीसाठी ‘बॅड टच व गुड टच’ या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत डॉ. किर्ती देशमुख व डॉ. कांचन नारखेडे यांनी मार्गदर्शन केले. डॉ. देशमुख म्हणाल्या की, जवळचे नातेवाईक अथवा अन्य कोणी यांनी केलेला स्पर्श आवडला नाही तर भितीपोटी मुली घरी आई बाबांना सांगत नाहीत. या स्पर्शाला नकार द्या, तिथून ताबडतोब निघून जा आणि घडलेली घटना आई वडीलांसोबत शेअर करा. हे तीन महत्वाचे टप्पे अमलात आणले तर स्वत:चे नुकसान होणार नाही असे त्या म्हणाल्या. डॉ. कांचन नारखेडे यांनी चांगल्या स्पर्शात आनंद व सुरक्षितता वाटते तर वाईट स्पर्शात मुलींना असुरक्षितता वाटते. असे सांगून यातील फरक स्पष्ट केला.

या कार्यशाळेचे उद्घाटन प्र-कुलगुरू प्रा. एस.टी.इंगळे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी आजीवन अध्ययन विभागाच्या वतीने समाजपयोगी उपक्रम घेतले जात असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य मॅथ्यू अब्राहम यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. विभागाचे संचालक प्रा. आशुतोष पाटील यांनी प्रास्ताविकात विभागाची भूमिका मांडली. यावेळी शिक्षणशास्त्र प्रशाळेच्या संचालक डॉ. मनिषा इंदाणी मंचावर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष पवार यांनी केले. मिनाक्षी पाटील यांनी आभार मानले.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like