जैन इरिगेशन कंपनीच्या अडचणी दूर, कर्ज निराकरण योजना मंजूर
खान्देश लाईव्ह | ३१ मार्च २०२२ | जळगाव येथील जैन इरिगेशन कंपनीच्या सर्व कर्जदारांच्या सभेत कंपनीसाठी कर्ज निराकरण योजना मंजूर झाली. विविध राज्य सरकारांकडून कंपनीचे पैसे मिळण्यास उशीर झाल्यामुळे जैन इरिगेशन कंपनीला खेळत्या भांडवलाची अडचण येत होती. त्यामुळे कंपनीवरील आर्थिक ताण बराचसा हलका होणार असल्याची घोषणा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी केली आहे.
सगळया भागधारकांची श्रद्धा, आणि कर्जदारांचा व्यवस्थापनावर असलेला विश्वास यामुळे कंपनीला आणि व्यवस्थापनाला ही कर्ज निराकरण योजना यशस्वीपणे अमलात आणता आली, अशी प्रतिक्रिया व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी व्यक्त केली. परिणामी कर्जफेडीवरही त्याचा परिणाम होत होता; मात्र, कंपनीला आता कर्ज निराकरण योजना मंजूर झाल्यामुळे मागील काळातील सर्व अडचणी दूर केल्या आहेत. एकत्रित निराकरण झालेल्या कर्जाची रक्कम सुमारे ३८७८ कोटी रूपये झाली आहे. शिवाय संपूर्ण कर्जाच्या ४० टक्के कर्ज अपरिवर्तनीय कर्जरोख्यांमध्ये ०.०१ टक्के व्याजावर परिवर्तीत करण्यात आले आहे.
जैन इरिगेशन कंपनीच्या व्याजाचा मोठा बोजा कमी झाला आहे. या योजनेमुळे कर्जदारांना ७.८९ कोटी रुपयांचे साधारण समभाग देण्यात आले आहेत. शिवाय, कंपनीला ३०० कोटी रुपयांचे अतिरिक्त खेळते भांडवलही उपलब्ध होणार आहे. कंपनीने घेतलेल्या कर्जाच्या व्याजाच्या दरातही मोठी घट झाली असून हा मोठा फायदा कंपनीला झाला आहे. कंपनीचा निधी प्रवाह आता सुरळीत होणार असून कंपनीच्या कामकाजात त्यामुळे मोठी सुधारणा होणार आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम