कृषि वीजबिलातून १५ दिवसांत व्हा मुक्त, ५० टक्के थकबाकीची रक्कम होणार माफ
खान्देश लाईव्ह | १७ मार्च २०२२ | कृषि वीजबिलातून १५ दिवसांत व्हा मुक्त, ५० टक्के थकबाकीची रक्कम होणार माफकृषि वीजबिलातून १५ दिवसांत व्हा मुक्त, ५० टक्के थकबाकीची रक्कम होणार माफ करण्यात येणार आहे.
कृषिपंपाच्या वीजबिलांमधून थकबाकीमुक्त होण्यासाठी आता केवळ १५ दिवस राहिले आहेत. कृषी वीज बिलाच्या सुधारित थकबाकीची ५० टक्के रक्कम व पूर्ण चालू वीजबिल येत्या ३१ मार्चपर्यंत भरल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकीची रक्कमही माफ करण्यात येणार आहे.
५० टक्के थकबाकी तसेच सर्व चालू वीजबिलांचा येत्या ३१ मार्चपर्यंत भरणा केल्यास उर्वरित ५० टक्के म्हणजे तब्बल १०९५ कोटी रुपयांची माफी शेतकऱ्यांना मिळणार आहे.
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून राज्यात कृषिपंप वीजजोडणी धोरण राबविण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यातील २ लाख ८ हजार ५०७ शेतकऱ्यांच्या मूळ थकबाकीमधील व्याज व विलंब आकारातील सूट, वीजबिल दुरुस्ती समायोजन तसेच महावितरणकडून निर्लेखनाचे एकूण ११५६ कोटी रुपये माफ करण्यात आले.
त्यामुळे सध्या शेतकऱ्यांकडे वीजबिलांपोटी २१९० कोटी रुपयांची सुधारित थकबाकी आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख २ हजार ४४९ शेतकऱ्यांनी १०९ कोटी ४७ लाख रुपयांचे वीजबिल भरून योजनेत सहभाग घेतला आहे.
कृषिपंप वीजजोडणी धोरणानुसार कृषी वीजबिलांच्या चालू व थकीत बिलांच्या भरण्यामधील ६६ टक्के रकमेचा कृषी आकस्मिक निधी हा ग्रामपंचायत (३३ टक्के) आणि जिल्हास्तरावर (३३ टक्के) कृषी वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामध्ये प्रत्येकी ३९ कोटी १३ लाख रुपयांचा निधी हा ग्रामपंचायत व जिल्हा क्षेत्रातील वीजयंत्रणेच्या विकास कामांसाठी वापरण्यात येणार आहे.कृषी ग्राहकांच्या बिल दुरुस्तीचे प्रस्ताव मंजूर करुन दुरुस्तीनंतरची सुधारित थकबाकीची रक्कम ग्राहकांना तात्काळ कळविण्यात येत आहे.
थकबाकीदार शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे व थकबाकीमुक्त योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. ज्या शेतकऱ्यांची वीजबिलांबाबत तक्रार किंवा शंका असेल त्याचे तातडीने निराकरण करावे व या योजनेचा लाभ सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांना करून देण्यासाठी जिल्ह्यात १० मार्च ते ३१ मार्च या कालावधीत विविध गावांमध्ये कृषी ग्राहकांच्या देयक दुरुस्ती संदर्भात शिबिरे आयोजित करण्यात आली असून या शिबिरांमध्ये ग्राहकांचा मंजूर वीजभार, मीटर वाचन, थकबाकी या स्वरुपाच्या सर्व तक्रारींचे निराकरण करण्यात येत आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम