जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात सायबर क्राईमवर कार्यशाळा
खान्देश लाईव्ह | १५ नोव्हेंबर २०२२ | महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये इंटरनेट वापरण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे त्यांना सायबर गुन्ह्यांची व त्यापासून बचावासाठी कोणत्या उपाय योजना कराव्यात, यासंबंधी माहिती होण्यासाठी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालय आणि जळगाव सायबर क्राईम सेल यांच्यातर्फे “सायबर सुरक्षितता आणि जागरूकता” याविषयावर ता. १५ मंगळवार रोजी कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल तर प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव सायबर क्राईम सेलचे पोलीस नाईक सचिन सोनवणे व एमकेसीएल सायबर क्राईम अवरनेसचे समन्वयक उमाकांत बडगुजर हे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी पोलीस नाईक सचिन सोनवणे यांनी जळगाव जिल्ह्यात झालेल्या सायबर गुन्ह्यांची उदाहरणे देत गुन्हेगार काय तंत्र वापरून कसे फसवतात याचे उदाहरण दिले. तसेच मोबाईल, इंटरनेट, ऑनलाईन अकाउंट आदीद्वारे विविध प्रकारे फसवणूक करण्यात येते. त्यांनी इंटरनेट, सायबर गुन्हेगारी म्हणजे नक्की काय ? युवकांनी या गुन्ह्यांच्या प्रभावापासून स्वत:चे कसे संरक्षण केले पाहिजे तसेच सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार आणि त्याविरोधी असणारे शासनाचे कायदे, महाविद्यालयीन युवकांनी बाळगावयाची दक्षता या संबंधी विस्तृत आणि प्रत्यक्ष उदाहरणांसह मार्गदर्शन केले. ऑनलाईन फसवणूक, अश्लील चित्रफिती, खोटी वा चुकीची माहिती, जाणीवपूर्वक त्रास देणे, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा दुरुपयोग, बक्षिसांचे आमिष देणारे मेसेज, पोर्नोग्राफी अशा अनेक सायबर गुन्हे घडणाऱ्या बाबींची सविस्तर माहिती दिली. यावेळी कायद्याचे ज्ञान नसल्यामुळे तरून पिढी कळत नकळतपणे सायबर गुन्हेगारीच्या जाळ्यात अडकते. या संबंधात घ्यावयाची काळजी आणि दक्षता तसेच कायद्याचे स्वरूप यामुळे युवकांना सायबर गुन्हेगारीपासून आपला आणि आपल्या प्रियजनांचा बचाव कसा करता येईल याचे विस्तृत विवेचन त्यांनी केले. याप्रसंगी कार्यक्रमात सुमारे दोनशे विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन अभियांत्रिकी प्रथमवर्ष विभागप्रमुख प्रा. जितेंद्र वडदकर व प्रा.प्रिया टेकवानी यांनी केले तसेच या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जनसंपर्क अधिकारी बापूसाहेब पाटील यांनी केले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितम रायसोनी व अॅकडमीक डीन प्रा. डॉ प्रणव चरखा यांनी अभिनंदन केले
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम