आई-वडिलांच्या ऋणातून उत्तराई होण्याचा प्रयत्न एक आदर्श

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I १ डिसेंबर २०२२ I आई-वडिल कर्तव्य म्हणून मुलांसाठी खूप काही करतात मात्र त्यांच्या जाण्यानंतर जन्मशताब्दीच्या निमित्ताने स्मृती ग्रंथाचे प्रकाशन ते ही वयाच्या 70 व्या वर्षी करणे हा जयंत गुरव यांचा पितृऋणातून उत्तराई होण्याचा प्रयत्न सर्वांसाठी आदर्श आहे असे आ. राजूमामा भोळे यांनी प्रतिपादन केले.

मायादेवी नगरातील रोटरी भवनात प्राजक्त…दरवळ स्मृतींचा… या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक चौधरी, शुटींग बॉल संघटनेचे सचिव के.आर.ठाकरे, महावीर हजारी, रमेश सुर्यवंशी, डॉ. अजय वैष्णव, जयंत गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती.
मामासाहेब उर्फ कोंडदेव शंकरराव गुरव हे क्रिडा क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तीमत्व होते. जिल्ह्यातील व्हॉलीबॉल खेळाडूंचे ते मार्गदर्शक होते. त्यांच्या मार्गदर्शनात व्हॉलीबॉल शिकलेले व राज्य संघटनेचे अध्यक्ष असलेले ना. गिरीश महाजन यांनी या खेळातून आणि व्यायमातून कार्यक्षमता विकसीत केली आहे असे ही आ. भोळे यांनी भाषणात सांगितले.

मामासाहेब गुरव जन्मशताब्दी स्मृती ग्रंथाचे आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते प्रकाशनानंतर त्यांनी “एका मामासाहेबांच्या ग्रंथाचे दुसऱ्या मामांच्या हस्ते प्रकाशन हा योगायोग आहे असे सांगून मामा हे अापुलकीचे नाते आहे. मला जिल्ह्यात त्यामुळे खूप स्नेह लाभला असे सांगितले.

राज्य संघटनेचे सचिव के.आर.ठाकरे (जामनेर) यांनी मामासाहेबांच्या जामनेर येथील योगदानाच्या गौरवपूर्ण उल्लेख करुन त्यांनी प्रत्येकाला शिस्त लावली पण आत्मीयतेची वागणूकही दिली असे मनोगतात सांगितले. 1972 ते 80 या काळात मामासाहेब गुरव यांनी जिल्ह्याला व्हॉलीबाॅल खेळाची पंढरी बनवली. त्यावेळी खेळाडू पैश्यांसाठी नव्हे तर जिद्दीसाठी खेळत होते असे जेष्ठ खेळाडू महावीर हजारी यांनी म्हटले.
शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक चौधरी यांनी मामासाहेबांनी मार्गदर्शन करुन सी.आर.आर्डे यांना मला प्रोत्साहीत करण्याचा सल्ला दिला या दोघे व्यक्तीमत्त्वांनी माझ्या खेळातील गुण हेरुन उणीवा दूर केल्या त्यामुळे मी राष्ट्रीय कर्णधार होऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या प्रेरणेने यश मिळवू शकलो अशी भावना व्यक्त केली.

विठ्ठल पाटील यांनी शिक्षकांनी साने गुरुजींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा अशी शिकवण मामासाहेब नेहमी देत असत तर मोहिनी भंडारे,गणेश गुरव व वर्षा कारेकर यांनी मामासाहेब हे कुटुंबीयासाठी वटवृक्ष होते असे मत मांडले.
सुकलाल धीवर यांनी स्वागत गीत तर आभार प्रदर्शन गौरव सफळे यांनी केले. प्रकाशन सोहळ्यास मामासाहेब गुरव यांचे काही समकालीन खेळाडू, प्रशिक्षक, पदाधिकारी, हितचिंतक व कुटुंबीय यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like