उपकरणे हाताळण्याचे प्रशिक्षण मिळाल्यानंतर आत्मविश्वासात वाढ होईल – कुलगुरू
खान्देश लाईव्ह | २१ नोव्हेंबर २०२२ | प्रयोगशाळेतील संशोधनासाठीची उपकरणे हाताळण्याचे प्रशिक्षण मिळाल्यानंतर विषयातील स्पष्टतेसोबत प्रशिक्षणार्थीच्या आत्मविश्वासात वाढ होईल असे प्रतिपादन कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था यांच्या सहकार्याने प्रयोगशाळांमधील उच्च व संशोधन उपकरणे कशी हाताळावीत या विषयावर महाराष्ट्रातील अध्यापकांच्या कार्यशाळेला सोमवार दि. २१ नोव्हेंबर पासून प्रारंभ झाला. या कार्यशाळेचे उद्घाटन करतांना कुलगुरू प्रा. माहेश्वरी बोलत होते. यावेळी मंचावर प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेचे समन्वयक सुरज बाबर उपस्थित होते २६ नोव्हेंबर पर्यंत होणा-या या कार्यशाळेत महाराष्ट्रातील ४२ अध्यापक सहभागी झाले आहेत.
प्रा. माहेश्वरी म्हणाले की, महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेमार्फत अशा प्रकारचे प्रशिक्षण देशात पहिल्यांदाच दिले जात आहे ही अध्यापकांसाठी अत्यंत उपयोगी बाब आहे. या निमित्ताने विविध उपकरणे हाताळतांना त्या संदर्भातील सखोल माहिती मिळेल. यावेळी प्रा. एस. टी. इंगळे यांनी उपस्थितांना विद्यापीठाविषयी माहिती दिली. सुरज बाबर यांनी अध्यापक विकास संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. प्रा. विकास गिते यांनी प्रास्ताविकात कार्यशाळेच्या रूपरेषेची माहिती दिली. प्रा. के. पी. दांडगे यांनी आभार मानले.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम