विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठीचे उपक्रम राबवावे – कुलगुरू
खान्देश लाईव्ह | १५ नोव्हेंबर २०२२ | विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठीचे मोजकेपण नावीन्यपूर्ण उपक्रम विद्यार्थी विकास विभागामार्फत विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये राबविले जावेत अशी अपेक्षा कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी व्यक्त केली.
मंगळवार दि. १५ नोव्हेंबर रोजी प्राचार्य, संचालक, जिल्हा विद्यार्थी विकास समन्वयक आणि विद्यार्थी विकास अधिकारी यांची समन्वय व सहविचार कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन करतांना कुलगुरू प्रा. माहेश्वरी बोलत होते. यावेळी मंचावर विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक प्रा. सुनील कुलकर्णी, वित्त व लेखाधिकारी सीए रवींद्र पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. दीपक दलाल उपस्थित होते.
कुलगुरू आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, आपल्या विद्यापीठाचा विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत उतरेल असा तयार करण्याचे उद्दीष्ट सर्वांना डोळ्यासमोर ठेवायला हवे. त्यासाठी विद्यार्थ्याच्या व्यक्तीमत्वाचे पैलू पडावेत म्हणून अभ्यासाव्यतिरिक्त इतर उपक्रम राबविणे गरजेचे आहे. हे उपक्रम विद्यार्थी विकास विभागामार्फत राबविण्यासाठी सात कोटी रूपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील असे नाविन्यपूर्ण उपक्रम यामधून राबविले जावेत अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखविली. प्रारंभी प्रा. सुनील कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. उद्घाटनानंतर अर्थसंकल्पीय तरतूद आणि खर्च यावर सीए रवींद्र पाटील, प्रश्नसंच निर्मिती आणि ऑनस्क्रिन परीक्षा मूल्यांकन यावर प्रा. दीपक दलाल यांनी मार्गदर्शन केले.
दुपारच्या सत्रात लेखा परीक्षणांच्या अडचणींबाबत उपवित्त व लेखाधिकारी एस.आर. गोहिल, सनदी लेखापरीक्षक सीए ए.आय. कोठारी यांनी मार्गदर्शन केले. प्रा. सुनील कुलकर्णी यांनी विद्यार्थी विकास विभागाच्या उपक्रमांचा आढावा घेतला. सायंकाळी प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे व कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचा समारोप झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरूषोत्तम पाटील यांनी केले, वसंत वळवी यांनी आभार मानले.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम