कंडारीच्या तरुणाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I ४ डिसेंबर २०२२ I वाघूर धरणाच्या भिंतीलगत असलेल्या झाडाला घरातून निघून गेलेल्या अरुण रामकृष्ण कोळी (वय-३४, रा. कंडारी ता. जळगाव) या तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात शनिवारी 3 डिसेंबर रोजी दुपारी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कंडारी येथे अरुण कोळी हा तरुण वास्तव्यास असून १ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घरातून निघून गेला होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतल्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, अरुणचे काका बापू कोळी यांच्यासह नातेवाईक परिसरातील जंगलात अरुणचा शोध घेत असतांना ते वाघूर धरणाच्या परिसरात गेले.

याठिकाणी धरणाच्या भिंतीला लागून असलेल्या झाडाला अरुण याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. बापू कोळी यांनी घटनेची माहिती तात्काळ नशिराबाद पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह खाली उतरवित तो शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केला. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like