खेडी खुर्द येथे घरात पाय घसरून पडल्याने युवकाचा मृत्यू
खान्देश लाईव्ह | २२ मार्च २०२२ | जळगावला लागून असलेल्या खेडी खुर्द येथे घरात पाय घसरून पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे ३७ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
खेडी खुर्द येथील दीपक प्रभाकर पाटील (वय-३७) असे मयत तरुणाचे नाव आहे. हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून तो गेल्या काही दिवसापासून आजारी असल्याने घरीच राहत होता. त्याची पत्नी मुलासह माहेरी गेली होती. त्यानंतर तो वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी गेला. मंगळवारी २२ मार्च रोजी सकाळी १० वाजले तरी दीपक उठला नसल्याने त्याचे वडील दीपक झोपलेल्या ठिकाणी गेले.
कोणत्याही प्रकारची हालचाल होत नसल्याने त्याच्या वडीलांनी खिडकीतून बघितले असता, दीपक जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. आपला मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याचे बघताच त्यांनी एकच आक्रोश केला. त्यानंतर आपल्या कुटुंबियांच्या मदतीने त्याला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्याची तपासणी केली असता, त्याला मयत घोषित केले.
त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. पाय घसरून पडल्याने दीपकच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम