शिक्षण व्यवस्था निर्माण झाल्यास आत्मजाणिवेची भावना – डॉ. विलास चव्हाण
खान्देश लाईव्ह I ६ डिसेंबर २०२२ I शिक्षण व्यवस्था निर्माण झाल्यास आत्मजाणिवेची भावना निर्माण होवून समाजात वैचारिक चिंतनेची प्रकिया सुरू होवून समाजाला प्रश्न विचारायला सुरूवात होते अशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची धारणा होती. त्यामुळेच त्यांनी शिक्षणावर विशेषत: उच्च शिक्षणावर भर दिला असे प्रतिपादन आंबेडकरी विचारांचे अभ्यासक डॉ. विलास चव्हाण यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विचारधारा प्रशाळा अंतर्गत महात्मा फुले अध्ययन व संशोधन केंद्र आणि डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिना निमित्त डॉ. चव्हाण यांचे व्याख्यान विद्यापीठात आयोजित करण्यात आले होते. कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी अध्यक्षस्थानी होते.
विशुध्द राष्ट्रनिर्मितीचा प्रज्ञावंत राष्ट्रनिर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर डॉ. चव्हाण बोलत होते. अस्पृश्यता निवारण आणि अस्पृश्यांची निर्मिती ही दोन महत्वाची कामे बाबासाहेबांनी केली. उच्च शिक्षणाचा आग्रह त्यांनी सातत्याने धरला सामाजिक विचारक्रांतीची बीजे शिक्षणात आहेत. कारण शिक्षणामुळे आत्मजाणिव निर्माण होवून चिंतनाची प्रक्रिया सुरु होते. यातून व्यक्तीविकास आणि परिवर्तनाला प्रारंभ होतो. समाजाला प्रश्न विचारायला सुरुवात होते अशी त्यांची धारणा होते. बाबासाहेबांनी विद्या, विनय आणि शील संवर्धनावर भर दिला. राजकीय सत्तेतील सहभागही त्यांनी महत्वाचा मानला. बंधुता, मानवता, स्वातंत्र्य आणि समता यावर आधारीत राज्यघटना निर्माण करतांना बाबासाहेबांसोबत इतरांचाही समावेश होता. बाबासाहेबांच्या चळवळीत कधीही हिंसा झाली नाही. राष्ट्र निर्मितीच्या योगदानात बाबासाहेबांची भूमिका मोलाची राहिली असे डॉ. चव्हाण म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी समानता हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा गाभा होता. तत्कालिन सामाजिक परिस्थितीचे त्यांना भान होते. भारत सदृढ व्हावा हे त्यांचे स्वप्न होते. लोकशाही बळकट होण्यासाठी कायम प्रयत्न करावेत हेच त्यांना अभिवादन ठरेल असे ते म्हणाले.
प्रारंभी डॉ. विजय घोरपडे यांनी अभिवादन गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब सुर्यवंशी यांनी केले. मंचावर विचारधारा प्रशाळेचे संचालक प्रा. म.सु. पगारे, प्रा. आर.जे. रामटेके, प्रा. पवित्रा पाटील उपस्थित होते.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम