कोरोनाशी दोन हात करणारी योद्धा
खान्देश लाईव्ह | ८ मार्च २०२२ | महिलादिन निमित्ताने जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी भारती कैलास सोनवणे यांचे पतीने मनोगत व्यक्त केले. पत्नीबद्दल मी काय लिहावे, कसे लिहावे हे सुचतच नाही. तिच्याबद्दल बोलावे तेवढे कमीच आहे. घर कुटुंब सांभाळत, जीवाची पर्वा न करता कोविड काळात तिने जे कार्य केल जळगावकर कायम लक्षात ठेवतील असे आहे. माझी अर्धांगिनी म्हणजे जळगाव शहराची माजी प्रथम नागरिक भारती सोनवणे. आज महिला दिनानिमित्त कोरोनाकाळात तिने केलेल्या कार्याबद्दल थोडक्यात व्यक्त होण्याचा प्रयत्न करतो.
देशात सर्वकाही सुरळीत सुरू असताना अचानक काही महिन्यांपूर्वी कोरोनाने शिरकाव केला. एकीकडे जगात कोरोना डोके वर काढत असताना जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी भारती यांना संधी मिळाली.जळगाव शहराच्या महापौरपदाचा कार्यभार भारती यांनी जानेवारी २०२० महिन्याच्या अखेरीस हाती घेतला. महापौर पद हाती येताच सेवा परमो धर्म: तत्वाला अनुसरून त्या कामाला लागल्या. जनतेच्या सुरक्षिततेसाठी महापौरांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून दिवसरात्र विविध उपाययोजना राबविल्या.
मनपाचा कार्यभार समजून घेत मागील आढावा घेण्यात फेब्रुवारी महिना उलटला. मार्च महिन्याच्या सुरुवातीला कोरोना जिल्ह्याच्या वेशीपर्यंत येऊन पोहचताच महापौरांनी नियोजनाला सुरुवात केली. गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचा फैलाव अधिक असल्याचे लक्षात घेऊन भारती यांनी मुस्लीम धर्मगुरू, मौलाना आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची मनपात बैठक घेतली. देशभर लॉकडाऊन होण्यापूर्वीच त्यांनी इतरांना जागरूक करून आपलं कर्तव्य पार पाडले.
जळगाव शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर मध्यरात्रीच मला सोबत घेत भारती या त्या रुग्णाच्या कुटुंबियांची चौकशी करण्यासाठी पोहचल्या.
संपूर्ण परिसर रात्रीच स्वतः उभे राहून निर्जंतुक करून घेतला. मला आठवते कि, पहिल्या रुग्णाच्या घरी भेट देऊन येताना मनात प्रचंड भीती होती. कुटुंबियांना न भेटताच अगोदर अंघोळ करून मग योग्य ती खबरदारी घेत पुढे काम सुरु केले. जळगाव शहरात कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी महापौरांनी प्रत्येक प्रभाग आणि प्रत्येक गल्ली निर्जंतुक करून घेतली. स्वतः प्रत्येक गल्लीबोळात फिरून नागरिकांशी चर्चा केली. काही ठिकाणी सामाजिक संस्थांची देखील मदत घेतली.भारती यांनी त्या परिसरात जाऊन समुपदेशकाची भुमिका निभावली. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना स्वतःची दक्षता घेण्याचा सल्ला दिला. काही समजून घेण्याची रुग्णांची आणि नातेवाईकांची मनस्थिती नव्हती तरीही संयम ठेवून तिने आपले कर्तव्य बजावले. इतकंच काय तर घरात मुले आणि कुटुंबीय कोरोना पॉझिटिव्ह झाले तरी भारती यांचे कार्य सुरूच होते.
जळगाव शहर मनपाकडून कोरोना बाधित असलेल्या रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. रुग्णांचे विचार सकारात्मक असावे, त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढावी यासाठी स्वतः योगशिक्षिका असलेल्या भारती यांनी कोरोना बाधित आणि विलगीकरण केलेल्या रुग्णांना योगा शिकविण्यास सुरुवात केली. कोविड केअर सेंटरमध्ये असलेल्या असुविधांचा आढावा घेऊन तात्काळ त्या सोडविणे तसेच बहुतांशवेळी रुग्णांची किंवा कर्मचाऱ्यांची काही अडचण असल्यास स्वतः कोविड सेंटरला जाऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न केला. महापौर कोरोना पॉझिटिव्ह असल्यानंतर देखील घरी राहून त्यांनी रुग्णांशी फोनद्वारे संवाद साधला.
कोविड केअर सेंटरमध्ये जेवणाचा दर्जा योग्य प्रकारचा नसल्याच्या तक्रारी काही रुग्णांनी भारती यांच्याकडे केल्या. जेवण पुरवठादाराला वारंवार सांगून देखील सुधारणा होत नसल्याने अखेर भारती यांनीच दररोज कोविड केअर सेंटरमध्ये जाऊन चहा, नाश्ता आणि जेवण करण्याचा निर्णय घेतला. भारतीसह मी दररोज त्याठिकाणी जेवण करू लागल्याने अन्नपदार्थांचा दर्जा तर सुधारलाच शिवाय जेवण देखील वेळेवर मिळू लागले.कोरोना योद्धा म्हणून जळगावकर जनतेच्या रक्षणासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या पहाटे ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत कार्यरत होत्या. जनसेवा हेच जीवन म्हणून कार्यरत राहणाऱ्या भारती यांच्या कार्याला आज महिलादिनानिमित्त मानाचा मुजरा..!
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम