सत्ता गमावल्याचा सूड घेण्यासाठी महाराष्ट्राचा विकास रोखण्याचे षडयंत्र! खा. उन्मेष पाटील
खान्देश लाईव्ह |१ नोव्हेंबर २०२२ | अडीच वर्षांच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वच आघाड्यांवर आलेले अपयश लपविण्यासाठी आकांडतांडव करून त्याचे खापर शिंदे-फडणवीस सरकारवर फोडण्याचा ठाकरे पितापुत्रांचा प्रयत्न हा महाराष्ट्रातील गुंतवणूक रोखण्याचा आणि नव्या गुंतवणूकदारांमध्ये महाराष्ट्राविषयी संभ्रम निर्माण करण्याचा पद्धतशीर प्रयत्न आहे, असा थेट आरोप आज भाजपचे खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केला आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना खासदार उन्मेश दादा पाटील म्हणाले की
वेदान्त फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याचे ठाकरे सरकारचे अपयश उघडकीस येऊ नये यासाठी उलटा कांगावा करण्याचा प्रयत्न पुरता फसल्यानंतर आता महाराष्ट्राशी कोणताच संबंध नसलेल्या उद्योगांची खोटी यादी पुढे करून जनतेच्या मनात संशय निर्माण करण्याचे उद्योग ठाकरे पितापुत्रांनी सुरू केले आहेत. प्रत्यक्षात ज्या उद्योगांशी महाविकास आघाडी सरकारच्या काळात ठाकरे यांनी साधी चर्चादेखील केली नव्हती, सामंजस्य करारही झाला नव्हता, किंवा सरकारमार्फत कोणताही पत्रव्यवहारदेखील झाला नव्हता, अशा उद्योगांची खोटी यादी पुढे करून एक अपप्रचाराचे टुलकिट तयार करण्याचा या पितापुत्रांचा प्रयत्न महाराष्ट्राच्या भविष्यातील प्रगतीस आणि उद्योगस्नेही वातावरणास अडसर निर्माण करणाराच आहे असा गंभीर आरोपही खासदार उन्मेशदादा पाटील यांनी केला. अविश्वासाने आणि जनादेश लाथाडून अभद्र आघाडीद्वारे गैरमार्गाने मिळविलेली सत्ता अडीच वर्षांत गमावल्याच्या संतापातून ठाकरे पितापुत्रांचा हा थयथयाट सुरू असून, याचा सूड महाराष्ट्रावर उगवण्यासाठी राज्यातील गुंतवणुकीत अडसर उभे करण्याचा भयंकर कट रचला जात आहे, असा संशय त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे. कोविडकाळात ठाकरे सरकारच्या भ्रष्ट कारभाराचे अनेक नमुने जनतेने प्रत्यक्ष अनुभवले आहेत. जुलमी, एककल्ली, हेकेखोर, आणि कायदा गुंडाळून ठेवत जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्या आघाडी सरकारने अडीच वर्षांच्या सत्ताकाळात महाराष्ट्राला दहा वर्षे मागे नेऊन काँग्रेसी राजवटीत नेले. मात्र, आता अशा कटकारस्थानांना केराची टोपली दाखवून राज्याला वेठीस धरणाऱ्यांना जनता त्यांची जागा दाखवून देईल असा इशाराही त्यांनी दिला. ठाकरे सरकारशी संबंधित असलेल्यांच्या भ्रष्टाचाराचे भयंकर नमुने आता उजेडात येऊ लागले आहेत. भ्रष्टाचाराच्या आणि देशद्रोह्यांना साह्य केल्याच्या आरोपाखाली तुरुंगाची हवा खावी लागलेल्या नेत्यांच्या पावलावर पाऊल टाकून आणखी काही बोलभांड नेत्यांना गजाआड जाण्याच्या भीतीने घाम फुटला असून त्या भीतीपोटीच हे आकांडतांडव सुरू आहे, असा टोलाही खासदार उन्मेश दादा पाटील यांनी लगावला .
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम