जळगाव जिल्ह्यात तंबाखू नियंत्रण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचे  आदेश – पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे

बातमी शेअर करा

जळगाव : पोलीस अधीक्षक जळगाव यांचे अधिनस्त मंगलम हॉल येथे जिल्ह्यातील सर्व पोलीस उपनिरीक्षक आणि तालुका आरोग्य अधिकारी यांचे तंबाखू नियंत्रण कायदा कोट्पा 2003  चे प्रशिक्षण पार पडले. मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, औरंगाबाद आणि जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत सदर प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.या प्रशिक्षण कार्यशाळेस मा. पोलीस अधीक्षक जळगाव मा. डॉ. प्रवीण मुंढे, उप पोलीस अधीक्षक (गृह), मा. श्री. संदीप गावित, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक मा. डॉ. पंकज पाटील, मा. श्री. विवेक पाटील सहा. आयुक्त, अन्न व औषध प्रशासन जळगाव हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.या प्रशिक्षण कार्याशाळेतून मा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी जिल्ह्यात कोट्पा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करतानाच कलम 6 ब – शैक्षणिक संस्थांच्या 100 यार्ड परिघात तंबाखू विक्री करणाऱ्यांवर प्रामुख्याने कारवाई करण्याबाबत आदेशित केले आहे.

सदर प्रशिक्षण कार्यशाळेचे प्रास्ताविक मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेच्या विभागीय व्यवस्थापक भाग्यश्री राठोड यांनी केले. भारतातील तंबाखूजन्य उत्पादनांची उत्पादन व सेवनाची सद्यस्थिती त्यांनी मांडली. श्री विवेक पाटील यांनी अन्न व औषध प्रशासन मार्फत केल्या जाणाऱ्या कारवायांबद्दल माहिती देऊन गुटखा बंदी बाबत व अवैध घुटख्यावरील जप्तीच्या कारवाया पुढेही सजगपणे सुरु राहतील असे नमूद केले.

डॉ. पंकज पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, यांनी तंबाखू सेवन आणि कोविड चा संबंध अधोरेखित करत सर्वांगीण आरोग्यासाठी तम्बाखुमुक्तीचे महत्व पटवून दिले. मा. श्री संदीप गावित, उप पोलीस अधीक्षक (गृह), यांनी तंबाखूचे विविध सर्व्हे मधून आलेल्या आकडेवारीनुसार पोलीस विभागामार्फत जनजागृती सोबत कोट्पा २००३, पोलीस अधिनियम आणि शासन निर्णयास अनुसरून योग्य ती दंडात्मक कारवाई करण्याचे सर्व पोलीस अधिकारी यांना सुचवले व सोबतच जिल्हा व तालुकास्तरीय समिती सोबत समन्वय साधण्याचे सांगितले. यावेळी सर्व उपस्थित प्रशिक्षणार्थी अधिकारी यांनी तंबाखू मुक्तीची शपथ घेतली.

जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष जळगाव चे जिल्हा सल्लागार डॉ. नितीन एस भारती यांनी तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे महत्व तसेच जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम, समुपदेशन आणि असंसर्गजन्य रोग नियंत्रणामध्ये तंबाखू मुक्तीचे महत्व, तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी सोप्या पद्धती बाबत सविस्तर माहिती दिली.मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे विभागीय व्यवस्थापक श्री अभिजित संघई आणि राज्य प्रकल्प अधिकारी झिया शेख यांनी कोट्पा कायद्यातील विविध कलमे आणि त्यातील तरतुदी व करावयाच्या कारवाई बाबत प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केले.

सदर कार्यशाळेस पोलीस निरीक्षक श्री विठ्ठल ससे, जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षातील सायकोलोजीस्ट निशा कटरे, सामाजिक कार्यकर्ता श्री राहुल बऱ्हाटे, कार्यक्रम सहाय्यक रुचिका साळुंखे मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे श्री गणेश उगले यांचे सहकार्य लाभले.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like