१९ विद्यार्थ्यांना राईझ शिष्यवृत्ती तर २ विद्यार्थ्याना नोकरी जाहीर
खान्देश लाईव्ह। ११ एप्रिल २०२२ । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संगणकशास्त्र प्रशाळेचे माजी विद्यार्थी व अमेरिकास्थित उद्योजक निलेश पाटील यांच्याकडून १९ विद्यार्थ्यांना राईझ शिष्यवृत्ती तर २ विद्यार्थ्याना नोकरी जाहिर केली आहे.
निलेश पाटील हे गेल्या १७ वर्षापासून अमेरिकेत उद्योजक म्हणून कार्यरत असून विविध कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी समकक्ष पदावर कार्यरत आहेत. संगणकशास्त्र प्रशाळेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमातील हुशार व गरजू विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे शिक्षणशुल्क, परीक्षा फी, वसतिगृह व मेसचे शुल्क आणि इतर खर्चासाठी राईझ या शिष्यवृत्ती योजनेंअंतर्गत आर्थिक मदत करीत असतात. नुकतीच त्यांनी प्रशाळेत भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि १९ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जाहिर केली आहे. तसेच श्री. पाटील यांनी प्रथम वर्षाच्या दोन विद्यार्थ्यांना नोकरी देण्याचे जाहिर केले आहे. श्री. पाटील यांनी प्रशाळेतील शिक्षकांसमवेत बैठक घेऊन काळाची गरज पाहून आजचे औद्योगिक क्षेत्राातील बदल यावर चर्चा करुन अभ्यासक्रमात काय बदल हवेत आणि थेअरी पेक्षा प्रात्यक्षिकांचा समावेश असलेला अभ्यासक्रम असावा याबाबत चर्चा केली. तसेच विविध प्रकारचे सॉफ्टवेअर विकसित करुन त्याचे पेटंट घ्यायला हवेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
निलेश पाटील यांनी कुलगुरु प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांची भेट घेऊन त्यांच्यासमवेतही चर्चा केली. तसेच विद्यापीठाच्या इनक्युबेशन सेंटरला भेट दिली. यावेळी प्रशाळेचे संचालक प्रा.एस.आर.कोल्हे, प्रा.मनीष जोशी, प्रा.भूषण चौधरी, आदी उपस्थित होते.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम