जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने “ताल सुरन का मेल” या कार्यक्रमाचे आयोजन
खान्देश लाईव्ह | ५ मार्च २०२२ | खान्देश लाईव्ह | ५ मार्च २०२२ | स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आणि भवरलाल ऍन्ड कांताबाई फाऊंडेशन तर्फे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने दसक्कर सिस्टर्स प्रेझेंटस् “ताल सुरनका मेल” या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दसक्कर सिस्टर्स प्रेझेंटस् “ताल सुरनका मेल” हा कार्यक्रम सोमवार दि. ७ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजता कांताई सभागृहात आयोजित करण्यात आलेले आहे. कार्यक्रमाच्या उदघाटन समारंभासाठी महापौर सौ. जयश्री सुनील महाजन, सौ. ज्योतीभाभी अशोक जैन, डॉ.अनुराधा अभिजित राऊत, डॉ.अमृता प्रवीण मुंढे, तसेच डॉ. शिल्पा किरण बेंडाळे या मान्यवरांची उपस्थिती राहील. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. स्मिता झारे करणार आहेत.
सौ. अश्विनी दसक्कर भार्गवे, कु. ईश्वरी दसक्कर, कु. गौरी दसक्कर, कु. सुरश्री (पूजा) दसक्कर भगिनी या नाशिकमधील संगीतक्षेत्रातील नामांकित घराण्यांपैकी एक म्हणजे दसक्कर घराण्याच्या चौथ्या नवीन पिढीचे नेतृत्व करीत असून संगीतक्षेत्रात सतत नवनवीन, वेगवेगळे, वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग करीत असतात. संगीतकलेचा वारसा घरातूनच मिळाला. त्यांचे सांगितिक शिक्षण आजोबा जेष्ठ संगीततज्ज्ञ पं. प्रभाकर दसक्कर काका माधव दसक्कर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संवादिनीवादक पं. सुभाष दसक्कर यांच्याकडे केले आहे. लहानपणीच स्वराज्ञानासारखी अवघड गोष्ट सहज साध्य झाल्याने शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, अभंग, भजन, गौळण, भावगीते, गझल, फ्युजन यांबरोबरच हार्मोनियम आणि सिंथेसायझर वादनात त्या पारंगत आहेत.
श्री. सुभाष दसक्कर यांच्या देशविदेशातील सांगीतिक देवाणघेवाणीमुळे सगळ्या प्रकारचे संगीत ऐकण्याची, वाजवण्याची, गाण्याची आवड निर्माण होत असतानाच दसक्कर भगिनींनी या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि अनोख्या प्रकाराला सुरुवात केली. हिंदी, मराठी भावगीते, सिनेसंगीतातील लोकप्रिय गीते यांबरोबरच पाश्चिमात्य सिम्फनी घेऊन त्यावर हा आगळावेगळा प्रयोग करत असतात. आजवर अनेक स्वरचना केल्या आहेत. त्यात मुख्यत्वेकरून बंदिशी, रागमाला, तराणे, प्रार्थना, देशभक्तीपर गीते अशा अनेक रचनांचा समावेश आहे.
नुकतीच त्यांनी “ताल सुरनका मेल” या अतिशय आगळ्या वेगळ्या दशरंगी प्रकारची निर्मिती केली. त्यातील शब्द, संगीत, गायन, वादन, संयोजन हे सगळे त्यांचेच असून त्यांच्यावरच चित्रित करण्यात आले आहे. हा नवीन, वैशिष्ट्यपूर्ण आणि आकर्षक प्रकार आजवर संगीतक्षेत्रात कुठेही झाला नाही, असे अनेक दिग्गज कलाकारांनी त्यांना सांगत त्यांचे भरभरून कौतुक केले आहे.
त्यांचे भारतात विविध प्रतिष्ठित महोत्सवांमध्ये अनेक मान्यवर कलाकारांच्या उपस्थितीत गाण्याचे व वादनाचे कार्यक्रम झाले आहेत. यामध्ये वसंतोत्सव पारनेर , सुश्री सीता पवार महोत्सव खंडवा , बालगंधर्व महोत्सव जळगाव , वर्ल्ड हार्मोनियम समीट बंगलोर , निनादिनी संगीत महोत्सव गोवा , देवगांधार संगीत महोत्सव , गोपीकृष्ण संगीत महोत्सव, नाशिक, नवदुर्गा पुरस्कार मुंबई, आदि अनेक ठिकाणी व मुंबई आकाशवाणी, रेड एफएम, माय एफएम अशा रेडिओ वाहिन्यांवर त्यांचे कार्यक्रम झाले आहेत.
त्यांना शक्ती पुरस्कार, ज्ञानगंगा पुरस्कार , रासबिहारी इंटरनॅशनल स्कुल म्युझिक अवॉर्ड, नाशिकचा लावण्यवती पुरस्कार अशा अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांनासन्मानित केले गेले आहे. त्यांना गायन व वादनासाठी भारत सरकारची मान्यताप्राप्त स्कॉलरशिप दिली आहे. तसेच त्यांनी संगीत MA पदवी आणि संगीत विशारद विशेष नैपुण्यासह प्राप्त केले आहे. त्यांनी आजवर बालसाहित्यातील अनेक कवितांना आकर्षक स्वररचना देऊन संगीतबद्ध केले आहे. लहान मुलांमध्ये शास्त्रीय संगीताची गोडी कशी निर्माण करावी या विषयावर त्यांचे विशेष प्रेम व अभ्यास आहे.
काही नाटके व एका शॉर्टफिल्म साठी त्यांनी गाण्याची रचना व संगीत संयोजनाचे काम केले आहे. दसक्कर सिस्टर्स या त्यांच्या युट्युब चॅनल, फेसबुक पेज व इन्स्टाग्राम पेजवर त्या नवनवीन प्रयोग सादर करत असतात. चांदोरकर प्रतिष्ठानाने जळगावच्या सांस्कृतिक समृध्दी साठी सतत काहितरी वेगळं देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. समस्त महिला वर्गाने असा हा कार्यक्रम चुकवू नये. अर्थात तो सर्व रसिकांसाठी खुला आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम