शासनाकडून निधी मंजूर तर आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लक्ष
खान्देश लाईव्ह | २६ मार्च २०२२ | जळगाव शहरातील रस्ते, तसेच इतर विकास कामांसाठी शासनाने ४२ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यावरील ‘स्टे’उठविण्यात आला आहे, तसे पत्रही प्राप्त झाले आहे. त्यामुळे त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात यावे असे पत्र महापालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागास दिले आहे.
राज्य शासनाने जळगाव शहरातील रस्त्यांसाठी १०० कोटी रूपयाचा निधी मंजूर केला होता. यातील ४२ कोटी रूपयांच्या खर्चात अनावश्यक कामांचा सामावेश करण्यात आला होता. त्यामुळे २०१९ मध्ये कामांना स्थगिती देण्यात आली होती. या कामांची पुनर्रचना करण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत व महापालिका आयुक्त डॉ. सतीश कुळकर्णी यांची त्रीसदस्य समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीने दिलेल्या शिफारसींना प्रमाण मानून नवीन कामे घेण्यात आली.
शासनाच्या ४२ कोटीच्या निधीतील कामाच्या निवीदाही निघाल्या आहेत. त्यांचा मक्ताही देण्यात आला आहे. मात्र, ही सर्व कामे शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत होणार आहेत. शासनाकडून निधी मंजूरीचे पत्र प्राप्त होताच जळगाव महपालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागास पत्र दिले. जळगाव शहरातील विकास कामे तातडीने सुरू करून ती पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात यावीत असेही कळविले आहे. त्यामुळे आता सार्वजनिक बांधकाम विभाग कामे कधी सुरू करणार याकडे लक्ष लागून आहे.’
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम