हद्दपार आरोपीला अटक ; गावठी कट्टा हस्तगत
खान्देश लाईव्ह I ८ डिसेंबर २०२२ I गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेल्या आतीश रवींद्र खरात यास आदेशाचे उल्लंघण करीत शहरात आल्याप्रकरणी भुसावळ शहर पोलिसांनी मंगळवारी रात्री शहर हद्दीतून अटक केली. संशयीताच्या ताब्यातून गावठी कट्टादेखील जप्त करण्यात आला असून त्याच्याविरोधात शहर पोलिसात कॉन्स्टेबल विशाल साळुंखे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, संशयीताला बुधवारी भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
भुसावळ शहरातील समता नगर चौकात जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेला संशयीत आतीश रवींद्र खरात (25, समता नगर, भुसावळ, ह.मु.अकोला) आला असल्याची माहिती शहरचे निरीक्षक गजानन पडघाण यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले. संशयीत आतीशला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे अंग झडतीत गावठी कट्टा आढळल्याने तो जप्त करण्यात आला.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम