सीबीआयतर्फे राजमल लखीचंदसह तीन कंपन्यांच्या विरूध्द गुन्हा दाखल
खान्देश लाईव्ह I १५ डिसेंबर २०२२ I स्टेट बँकेची तब्बल ३५२ कोटी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राजमल लखीचंद सह तीन कंपन्या आणि त्यांच्या संचालकांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.
मंगळवारी दिवसभर राजमल लखीचंद ज्वेलर्स तसेच ईश्वरलाल जैन आणि त्यांच्या मालकीच्या तीन फर्मसह त्यांच्या निवासस्थानी सीबीआयच्या पथकाने छापे टाकले होते. यात अनेक कागदपत्रे जप्त करून संबंधीत पथक रवाना झाले होते. यानंतर काल म्हणजेच बुधवारी सीबीआयने या प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. सीबीआयने या प्रकरणात तीन स्वतंत्र गुन्हे नोंदविले आहेत.
या गुन्ह्यांमध्ये राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रा. लि.; आर.एल. गोल्ड प्रा. लि. आणि मानराज मोटर्स या तीन कंपन्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. या तिन्ही कंपन्यांचे प्रवर्तक/संचालक ईश्वरलाल शंकरलाल जैन, मनीष ईश्वरलाल जैन, पुष्पा ईश्वरलाल जैन आणि नितीका मनीष जैन यांच्या विरोधात देखील गुन्ह्याची नोंद झालेली आहे. स्टेट बँकेला राजमल लखीचंद ज्वेलर्समुळे २०६ कोटी ७३ लक्ष; मानराज मोटर्समुळे ७६ कोटी ५७ लक्ष तर आरएल गोल्डमुळे ६९ कोटी ९९ लक्ष रूपयांचा तोटा झाल्याचे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. जैन कुटुंबाने एसबीआय कडून घेतलेल्या कर्जाचा दुरूपयोग केल्याने हा तोटा झाल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे. ज्या उद्देशासाठी कर्ज दिले, त्यापेक्षा वेगळ्या कामांसाठी याचा विनीयोग करण्यात आला. तसेच तारण मालमत्तेची परस्पर विल्हेवाट लावण्यात आल्याचा आरोप देखील यात केलेला आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम