वयोवृद्धांचे हातपाय बांधून तीन लाखांचा ऐवज दरोडेखोरांनी लांबविला

खान्देश लाईव्ह | 30 डिसेंबर २०२२ | तालुक्यातील दुसखेडा गावातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. घरी कुणीच नसताना एकट्या असलेल्या वयोवृद्धाचे हातपाय बांधून दरोडेखोराने चाकूचा धाक दाखवून तब्बल तीन लाखांच्या लाखांच्या रोकडसह सोन्याचे दागिने मिळून चार लाख 56 हजारांचा ऐवज लांबवण्यात आला. गुरुवारी दुपारी एक वाजता घडलेल्या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
भर दुपारी लुटमुळे उडाली खळबळ
दुसखेडा येथील एकनाथ पांडू पाटील (88) हे गुरुवारी दुपारी घरी एकटेच होते. घरातील महिला शेजारी पापड करण्यासाठी गेल्या असताना एक दरोडेखोर चाकू घेऊन घरात शिरला. त्याने पाटील यांच्या तोंडात बोळा कोंबला आणि त्यांचे हात-पाय बांधून कपाटाजवळ नेले. दरोडेखोराने कपाटातील तीन लाख 10 हजारांची रोकड व सोन्याचे दागिने यात सोन्याची बिस्किटे, तुकडा, मंगळसूत्र, चपलाहार, सोन्याच्या बांगड्या आदी लांबवल्या. नातवाच्या लग्नासाठी या वस्तू त्यांनी जमा करून ठेवल्या होत्या. घरी कोणी नाही, ही संधी साधत दरोडेखोराने अवघ्या 20 मिनिटात हात साफ करीत पळ काढला.
यावेळी वृद्धानेच कशीबशी सुटका करीत दरवाजा उघडला, तोपर्यंत दरोडेखोर पसार झाला. या प्रकरणी पाचोरा पोलिसात एकनाथ पांडू पाटील यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तीन लाख 10 हजारांची रोकडसह दागिणे मिळून चार लाख 56 हजारांचा ऐवज लांबवण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. तपास उपनिरीक्षक योगेश गणगे करीत आहेत.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम