क्रूझरची वृक्षाला धडक ; एक मजूर जागीच ठार ,तीन गंभीर
विदगाव-ममुराबाद रस्त्यावरील घटना
खान्देश लाईव्ह | १७ ऑक्टोबर २०२२ | भरधाव क्रुझर वाहनाच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव वाहन वृक्षाला आदळून बाजूला असणाऱ्या चारीत जाऊन कोसळली . या झालेल्या अपघातात एक मजूर ठार तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील विदगाव-ममुराबादरस्त्यावर आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. कांतीलाल हिरालाल पावरा (वय-२६) रा. चांदसुरिया पोस्ट वासूडी ता. शिरपूर जि.धुळे असे मयत मजूराचे नाव आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , क्रुझर क्रमांक एमएच १८-०८०६ हि शिरपूर तालुक्यातील चांदसुरिया पोस्ट वासूडी येथील जगदीश जंगलू पावरा याचे वाहन असून त्याने जळगाव एमआयडीसी परिसरात असणाऱ्या वेअर हाऊस मधून धान्याचे पोते उतरविण्याचा ठेका घेतला असून मजुरांना घेऊन दररोज एमआयडीसी येथे येत असल्याने आज सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास मजुरांना घेऊन जगदीश पावरा हा ठेकेदार आणि वाहनाचा चालक विदगाव ममुराबाद रस्त्यावरून सकाळी ७ वाजेच्या सुमारास जात असताना वृक्षावर वाहन आदळून झालेल्या अपघातात एक मजूर जागीच ठार झाला . तर इतर तिघे गंभीर जखमी झाले. या अपघातात रणजित उर्फ राजा जयसिंग पावरा (वय-२४), गोकूळ वनासिंग भिल (वय-३०), वांगऱ्या कालूसिंग पावरा (वय-३०) हे तिघे गंभीर जखमी झाले आहे. तिघांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनास्थळी जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार माणिक सपकाळे, साहेबराव पाटील, विलास शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. याप्रकरणी मयताचा भाऊ शांतीलाल हिरालाल पावरा याच्या खबरीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम