खा.राहूल गांधी यांनी घेतला खान्देशी भरीत-भाकरीचा आस्वाद
भारत जोडो यात्रेसाठी डॉ. उल्हास पाटील यांच्याकडून ६ क्विंटल वाग्यांचे भरीत
खान्देश लाईव्ह | ९ नोव्हेंबर २०२२ | काँग्रेसचे नेते खा.राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. या यात्रेत त्यांच्यासमवेत हजारो पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनताही सहभागी झाली आहे. यात्रेदरम्यान खा. राहुल गांधी यांनी खान्देशी भरीताचा आस्वाद घेतला. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्यातर्फे तब्बल ६ क्विंटल वांग्याचे भरीत आणि भाकरीची व्यवस्था करण्यात आली आहे.
खान्देशात आलेल्या पाहुण्यांनी इथल्या वांग्याच्या भरीताची चव चाखली नाही तर गोष्टच वेगळी. संपूर्ण राज्यभरात वांग्याचे भरीत, भाकरी, दह्याची कोशिंबीर हा खान्देशी पाहुणचार प्रसिध्द आहे. गुलाबी थंडीत भरीत-भाकरीची चव नक्कीच पंचपकवान्नापेक्षा आस्वाद देणारी ठरते. त्यामुळे या खान्देशी पाहुणचाराला मोठे महत्व आहे. देशात राजकीय परीवर्तनासाठी काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांनी कन्याकुमारीपासून भारत जोडो यात्रेला सुरूवात केली आहे. ही यात्रा नुकतीच महाराष्ट्रात नांदेडमार्गे दाखल झाली आहे. खा. राहुल गांधी यांच्या समवेत हजारो पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्व सामान्य नागरिकही सहभागी झाले आहेत.
खा. राहुल गांधींनी घेतला भरीताचा आस्वाद
खा. राहुल गांधी आणि भारत जोडो यात्रेतील यात्रेकरूंसाठी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्यातर्फे तब्बल १० हजार जणांसाठी खान्देशी भरीत, भाकरी, दह्याची कोशिंबीर अशा बेताचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी तब्बल ६ क्विंटल वांगे उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच खान्देशी भरीत तयार करण्यासाठी डिंगबर कोल्हे या खाद्य तज्ञावर जबाबदारी सोपविण्यात आली होती. डिगंबर कोल्हे यांनी तयार केलेल्या खान्देशी भरीत आणि भाकरीचा काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांनी अक्षरश: बोटे चाखत आस्वाद घेतला. तसेच यात्रेत सहभागी झालेल्या यात्रेकरूंनीही खान्देशी पाहुणचारावर चांगलाच ताव मारला.
यांनी केले सहकार्य
खान्देशी पाहुणचारासाठी गोदावरी आयएमआर महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके, वैद्यकीय महाविद्यालयाचे वरीष्ठ लेखापाल योगेश पाटील, बापू नेमाडे, नरेंद्र पाटील, रोशन महाजन यांच्यासह गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्यांनी सहकार्य केले.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम