अध्यापक व विभागप्रमुखांच्या गणाची दुरूस्त मतदार यादी दुरुस्तीसाठी मुदत

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २३ नोव्हेंबर २०२२ | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर निवडून द्यावयाच्या सदस्यांसाठी प्राचार्य, अध्यापक, विद्यापीठ अध्यापक गटाची तसेच विद्यापरिषदेवर व अभ्यासमंडळावर निवडून द्यावयाच्या सदस्यांसाठी अध्यापक व विभागप्रमुखांच्या गणाची दुरूस्त मतदार यादी विद्यापीठाने दि. २२ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा प्रसिध्द केली असून याबाबतीत लेखी अपील कुलगुरूंकडे सादर करण्यासाठी २८ नोव्हेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. प्राचार्यांमधून अधिसभेवर १०, संलग्नित महाविद्यालये व परिसंस्थामधील अध्यापकांच्या गटांमधून अधिसभेवर १० आणि विद्यापीठ अध्यापकांच्या गटांमधून ०२ सदस्य निवडून द्यावयाचे आहे. याशिवाय संलग्नित महाविद्यालये व मान्यताप्राप्त परिसंस्था यांच्या विभागप्रमुखांच्या गटामधून अभ्यासमंडळावर ०३ विभागप्रमुख निवडून द्यावयाचे आहेत. तर विद्यापीठ अध्यापक गटांमधून तसेच महाविद्यालये व परिसंस्थांच्या अध्यापक गटामधून प्रत्येक विद्याशाखेनिहाय प्रत्येकी ०२ सदस्य विद्यापरिषदेवर निवडून द्यावयाचे आहेत. या बाबतीत विद्यापीठाने १५ नोव्हेंबर रोजी तात्पुरती निर्वाचक गणांची यादी प्रसिध्द करून आपल्या नावासमोर काही दुरुस्ती /बदल किंवा काही हरकत /आक्षेप असल्यास त्यासंदर्भातील लेखी अर्ज आवश्यक त्या पूरक कागदपत्रांसह दि. २१ नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली होती. प्राप्त झालेल्या कागदपत्रांसह सादर केलेल्या अर्जांची विद्यापीठ शासन अधिसूचना /परिनियमातील निकषांप्रमाणे तपासणी करून योग्य त्या दुरूस्त्या करून निर्वाचक गणाची दुरूस्त मतदार यादी आज दि. २२ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा प्रसिध्द केली आहे. या यादीचे अवलोकन करून संबंधितांनी याबाबत काही विवाद असल्यास कुलगुरूंकडे अपील करता येईल. या दुरूस्त यादीबाबत लेखी अपील आवश्यक त्या कागदपत्रांसह २८ नोव्हेंबर रोजी सायं. ५ वाजेपर्यंत विद्यापीठाच्या निवडणूक शाखेत (कक्ष क्र. ४१०) प्रत्यक्ष सादर करणे आवश्यक आहे. विहित तारीख वेळेनंतर प्राप्त होणाऱ्या अपिलावर कोणत्याही परिस्थितीत कार्यवाही केली जाणार नाही. याची नोंद घ्यावी असे कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विनोद पाटील यांनी कळविले आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like