बहिणाबाईंच्या साहित्यामुळे जगण्याचे बळ, प्रेरणा आणि ऊर्जा मिळते – साहित्यिक आबा महाजन 

बातमी शेअर करा

चौधरी वाड्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा 71 वा स्मृतिदिन साजरा

खान्देश लाईव्ह I ३ डिसेंबर २०२२ I बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्यामुळे सामान्य माणसाला जगण्याचे बळ, ऊर्जा आणि प्रेरणा मिळत असते. माझ्या शालेय आयुष्यात बहिणाबाईंची कविता आली आणि माझे जीवनच उजळून निघाले. धरत्रीला दंडवत या कवितेमुळे वाचनाची गोडी निर्माण झाली व आजपर्यंत प्रगती करू शकलो, साहित्य अकादमी पर्यंत पोहोचलो असे उत्स्फूर्त उद्गार सुप्रसिद्ध बाल साहित्यिक व शिरपूर येथील तहसीलदार आबा महाजन यांनी काढले. बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट आणि भवरलाल अण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे चौधरी वाड्यात बहिणाई स्मृती येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा 71 वा स्मृतिदिन साजरा झाला त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी बहिणाबाई ट्रस्टच्या विश्वस्त सौ. ज्योती जैन, श्रीमती स्मिता चौधरी, बहिणाबाईंच्या नातसून पद्माबाई चौधरी व्यासपीठावर उपस्थित होते.

बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टतर्फे चौधरी वाड्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आज बहिणाई स्मृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रस्तुत कार्यकमाच्या सुरुवातीला आबा महाजन व मान्यवरांच्या हस्ते बहिणाबाईंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात का.उ. कोल्हे विद्यालयातील विद्यार्थीनींनी व कवी प्रकाश पाटील यांनी बहिणाबाईची संसार ही कविता सादर केली. गिरीश कुळकर्णी यांनी गीता जयंती आणि बहिणाबाई चौधरी यांचा स्मृतिदिन हा योगायोग आहे. जीवन विकासाचे तत्त्वज्ञान सांगणारी गीता आणि बहिणाबाईची कविता आपल्या आजुबाजुला घडलेल्या घटनांचा संबंध उलगडून दाखविते. बहिणाबाई यांना मिळालेली प्रज्ञा ही दैवी देणगीच होती असे मत व्यक्त केले. लेवागण बोलीवर काम करणारे साहित्यिक अरविंद नारखेडे, यांनी देखील बहिणाबाईच्या साहित्याबाबत प्रकाशझोत टाकला. लेवा गणबोली कडे अधिक लक्ष देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. कवयित्री बहिणाबाईंच्या पुण्यतिथी निमित्त “विश्व लेवा गणबोली दिन साजरा केले जातो, या भाषेचे दोन सम्मेलन झाले आता जानेवारीत तिसरे सम्मेलन होणार आहे याबाबतची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. कार्यक्रमाचा समारोप कवयित्री शीतल पाटील यांच्या कवितेने झाला. सूत्रसंचालन व समारोप ज्ञानेश्वर शेंडे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक चौधरी, देवेश चौधरी, प्रदीप, सोनार यांच्यासह चौधरी वाड्यातील सदस्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास बहिणाबाईच्या नातसून पद्माबाई चौधरी, कला विभागाचे सहकारी विजय जैन, किशोर कुलकर्णी, देवेंद्र, दिनानाथ, कैलास, किरण, रंजना, कविता, शोभा, लक्ष्मी, कोकिळा, वैशाली, कोकिळा, सुनंदा, शालीनी चौधरी, हितेंद्र व विवेक चौधरी, साहित्यिक म्हणून तुषार वाघुळदे, अशोक पारधे, लिलाधर कोल्हे, पुष्पा साळवे, इश्वर राणा आदि मान्यवर उपस्थित होते.

 

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like