१३ जानेवारी २०२६ । खान्देश लाईव्ह ।स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाने पैसा, प्रशासन आणि यंत्रणांचा वापर करून लोकशाही मूल्यांना तडा दिला, असा आरोप करत, या सर्व दबावाला न घाबरता काँग्रेस कार्यकर्ता निर्धाराने उभा राहिला, त्यामुळेच राज्यात ४१ नगराध्यक्ष आणि १००६ नगरसेवक काँग्रेसचे विजयी झाले, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. नगरपालिकेप्रमाणेच येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्येही काँग्रेसचा झेंडा फडकवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महानगरपालिका निवडणूक प्रचारासाठी सोलापूर दौऱ्यावर असताना प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सपकाळ बोलत होते. ते म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान राज्यात घडलेल्या हिंसक घटनांमुळे राजकारणाचे विदारक चित्र समोर आले आहे. निवडणुकांमध्ये शहरातील मूलभूत प्रश्नांवर चर्चा होणे अपेक्षित असताना, सत्ताधारी पक्षाकडून इतर विषयांकडे मुद्दाम लक्ष वळवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
सपकाळ पुढे म्हणाले की, बिनविरोध निवडींचा वाढता प्रकार लोकशाहीसाठी चिंताजनक आहे. अशा ठिकाणी ‘नोटा’चा पर्याय प्रभावीपणे उपलब्ध करून देण्याची गरज असून, लोकशाही मूल्ये टिकवण्यासाठी सर्वांनी जागरूक राहिले पाहिजे.
अदानी प्रकरणावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, काँग्रेस पक्ष भांडवलदारांच्या विरोधात नाही; मात्र सरकारकडून एखाद्या उद्योगसमूहाला सर्वच क्षेत्रांत सवलती दिल्या जात असतील, तर त्याबाबत प्रश्न उपस्थित करणे चुकीचे नाही. राहुल गांधी जे मुद्दे उपस्थित करत आहेत, तेच मुद्दे अलीकडे शिवाजी पार्कवरील सभेत राज ठाकरे यांनीही मांडले असल्याचे त्यांनी नमूद केले. काँग्रेसची भूमिका ही देशहिताच्या दृष्टीने असल्याचे सपकाळ यांनी स्पष्ट केले.
वंचित बहुजन आघाडीबरोबरच्या युतीबाबत बोलताना सपकाळ म्हणाले की, मुंबई, लातूर आणि नांदेडमध्ये काँग्रेस आणि वंचितची आघाडी आहे. ही केवळ राजकीय आघाडी नसून विचारांचा मेळ आहे. ही युती पुढे नेण्यासाठी सहकारी पक्षांनी अनावश्यक आणि वादग्रस्त विधाने टाळणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
खासदार प्रणिती शिंदे यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर स्पष्टीकरण देताना सपकाळ म्हणाले की, प्रणिती शिंदे या काँग्रेसमध्येच आहेत आणि काँग्रेसमध्येच राहतील. याबाबत कोणताही संभ्रम नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेसचे स्थानिक व राज्य पातळीवरील पदाधिकारी उपस्थित होते.