विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांना प्रत्यक्ष उद्योगात रूपांतरित करण्यासाठी श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीने राबवलेला ‘विजनरी वेंचर्स २.०’ हा उपक्रम स्वयंरोजगाराच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे. विद्यार्थ्यांना केवळ मार्गदर्शनच नव्हे तर थेट आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देणारी एक दिवसीय कार्यशाळा व उद्योजकता स्पर्धा दि. ९ जानेवारी २०२६ रोजी महाविद्यालयाच्या सर सी. व्ही. रमण सभागृहात उत्साहात पार पडली.
विद्यार्थी विकास कक्ष, स्टार्ट-अप व आंत्रप्रिन्युअरशिप डेव्हलपमेंट सेल आणि करिअर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पीएम-उषा, डीबीटी स्टार व करिअर कट्टा या योजनांच्या माध्यमातून होतकरू विद्यार्थ्यांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक आधार देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
कार्यशाळेचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. व्ही. कोरपे यांनी भूषविले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे बिझनेस इन्क्युबेशन मॅनेजर श्री. अमोल हिरुळकर हे प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तर पी. आर. पोटे पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे श्री. अश्विन भोसले आणि सायबेज सॉफ्टवेअर प्रा. लि., पुणे येथील श्री. अनिरुद्ध शेलोटकर यांनी परीक्षक म्हणून भूमिका बजावली.
दीपप्रज्वलनानंतर पीएम-उषा योजनेचे समन्वयक डॉ. मनीष गायकवाड यांनी स्वागतपर भाषण केले. कार्यक्रमाचे सविस्तर प्रास्ताविक ‘विजनरी वेंचर्स’ उपक्रमाचे समन्वयक डॉ. दिनेश खेडकर यांनी केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. जी. व्ही. कोरपे यांनी विद्यार्थ्यांना उद्योजकतेकडे वळण्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन डॉ. स्वप्नील अरसड यांनी केले.
सन २०२३ पासून सुरू असलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या स्टार्ट-अप संकल्पनांना आर्थिक तसेच तांत्रिक सहकार्य दिले जात आहे. २०२३ मध्ये चार, तर २०२४ मध्ये पाच विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य देण्यात आले होते. यंदा एकूण २३ नवउद्योजक चमूंनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. त्यापैकी पाच उत्कृष्ट चमूंची निवड करण्यात आली असून, विजेत्यांना प्रत्येकी भरीव अनुदानाचे धनादेश प्रदान करण्यात आले.
यावर्षीच्या विजेत्या चमूंचे नेतृत्व दिपाली दिलीप दातीर, समृद्धी प्रवीण सोनोणे, खुशी राजेंद्र गुप्ता, जिया डहाके आणि ईश्वरी साबळे यांनी केले.
समारोपीय कार्यक्रमासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या इनोव्हेशन, इन्क्युबेशन व लिंकेजेस बोर्डचे संचालक डॉ. अजय लाड हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते धनादेश व पारितोषिक वितरण करण्यात आले. समारोपाचे सूत्रसंचालन डॉ. अर्चना बोदडे यांनी केले. मोठ्या संख्येने उपस्थित विद्यार्थ्यांनी कार्यशाळेचा लाभ घेतला.