लव्ह जिहाद व धर्मांतर हे भारताला कमकुवत करण्याचे छुपे षड्यंत्र – जगद्गुरु शंकराचार्य

बातमी शेअर करा

१३ जानेवारी २०२६ । खान्देश लाईव्ह । ‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतरा’ची वाढती प्रकरणे ही भारतीय संस्कृती, सनातन धर्म आणि हिंदुस्थानला कमकुवत करण्यासाठी आखलेले एक नियोजित व दूरगामी षड्यंत्र आहे, असे ठाम प्रतिपादन द्वारका शारदा पीठाधीश्वर श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती महाराज यांनी केले. हिंदु जनजागृती समिती व राष्ट्रभक्त अधिवक्ता समितीच्या पदाधिकाऱ्यांशी झालेल्या भेटीदरम्यान त्यांनी हे मार्गदर्शन केले.

या विषयाचा ऐतिहासिक संदर्भ देताना शंकराचार्य महाराज म्हणाले की, ज्या प्रकारे ‘ईस्ट इंडिया कंपनी’ व्यापाराच्या नावाखाली भारतात आली आणि कपटाने देशावर तब्बल २०० वर्षे राज्य केले, त्याच धर्तीवर आज धर्मांतराच्या माध्यमातून भारताला आतून कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. भारताचे लष्करी सामर्थ्य आणि संरक्षण व्यवस्था भक्कम असल्याने थेट आक्रमण शक्य नसल्यामुळे, विशिष्ट लोकसंख्या वाढवून देशाला अंतर्गत पातळीवर दुर्बल करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे, असा गंभीर इशाराही त्यांनी दिला.
पुणे येथे वेदाचार्य घैसासगुरुजी वेदपाठशाळेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शंकराचार्य महाराजांनी भागवत कथेचे भावपूर्ण निरूपण केले. याच वेळी हिंदु जनजागृती समिती व राष्ट्रभक्त अधिवक्ता समितीच्या अधिवक्त्यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत शंकराचार्य महाराजांनी समितीच्या कार्याचे कौतुक करत, “हिंदु जनजागृती समिती समाजात अत्यंत चांगले आणि राष्ट्रहिताचे कार्य करत आहे,” असे गौरवोद्गार काढले व आशीर्वाद दिले.

धर्मांतर व लव्ह जिहाद हा विषय केवळ धार्मिक नसून त्यामागे राजकीय वर्चस्व मिळवण्याचा अजेंडा असल्याचे स्पष्ट करताना ते म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेत बहुमताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे हिंदू समाजाची संख्या कमी करणे आणि स्वतःची लोकसंख्या वाढवणे हा एक सुनियोजित कट आहे, जेणेकरून भविष्यात मताधिकाराच्या जोरावर सत्ता हस्तगत करता येईल. याचप्रमाणे काही ख्रिश्चन मिशनरी संस्था ‘सेवे’च्या नावाखाली प्रलोभने देऊन धर्मांतर करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
या गंभीर परिस्थितीला आळा घालण्यासाठी अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारनेही ‘लव्ह जिहाद’विरोधात कठोर कायदा लागू करावा, अशी आग्रही मागणी शंकराचार्य महाराजांनी केली. तसेच, ज्या प्रकारे अल्पसंख्याकांना मदरसा व चर्चमधून धर्मशिक्षणाचे स्वातंत्र्य आहे, त्याचप्रमाणे शासकीय व निमशासकीय शाळांमध्ये हिंदू विद्यार्थ्यांसाठी ‘हिंदु धर्मशिक्षण’ अनिवार्य करावे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

शालेय जीवनापासूनच मुलांना आपल्या धर्माचे, संस्कृतीचे व संस्कारांचे ज्ञान मिळाल्यास कोणतेही प्रलोभन किंवा षड्यंत्र त्यांना विचलित करू शकणार नाही, असे सांगत सर्व राजकीय पक्ष, मुख्यमंत्री आणि राष्ट्रप्रेमी संस्थांनी या विषयाचे गांभीर्य ओळखून एकत्र येण्याचे आवाहन शंकराचार्य महाराजांनी केले.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment