खान्देश लाईव्ह I २२ डिसेंबर २०२२ Iशहरातील जी.एस. मैदानावर तरूणाला बेदम मारहाण करून गोळीबार करून फरार असलेल्या दोन संशयित आरोपींना जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे शोधपथकाने बुधवारी २१ डिसेंबर रोजी पहाटे ४ वाजता भुसावळातून अटक केली आहे.
जळगाव शहरातील टॉवर चौक ते चौबे शाळेदरम्यान असलेल्या अतिक्रमण काढण्याबाबत भगवान काशिनाथ सोनार (वय-३९) रा. शिवाजी नगर, जळगाव यांनी जळगाव महापालिकेत तक्रार दिली होती. रविवारी ११ डिसेंबर रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास जी.एस. मैदानाच्या मुख्य गेटजवळ भगवान सोनार याला पंकज उर्फ ढेक्या सुरेश पाटील रा. शिव कॉलनी, जळगाव याने महापालिकेत दिलेल्या तक्रारीच्या कारणावरून मारहाण केली. तर पंकज पाटील सोबत असलेला किरण शंकर खर्चे रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव याने त्याच्या हातातील बंदुकीने फायर केले. फायर केल्याचे पाहताच भगवान सोनार याने आरडाओरड करत एसबीआय बँकेच्या चौकाकडे पळत सुटला. त्यानंतर पंकज पाटील आणि किरण खर्चे यांनी त्याचा पाठलाग करत पुन्हा गोळीबार केला. अंधाराचा फायदा घेत दोन्ही पसार झाले होते. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यानंतर दोन्ही संशयित आरोपी हे फरार झाले होते.
जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे शोध पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनिय माहितीच्या आधारे बुधवारी २१ डिसेंबर रेाजी पहाटे चार वाजेच्या सुमारास जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख, पोलीस नाईक जुबेर तडवी, पोलीस शिपाई अमित मराठे यांनी संशयित आरोपी पंकज उर्फ ढेक्या सुरेश पाटील रा. शिव कॉलनी, जळगाव आणि किरण शंकर खर्चे रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव यांना अटक केली आहे. दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.