मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या नावाने महत्वाकांक्षी योजना सन २०१९ -२० पासून ;  राज्यात जिल्हा उद्योग केंद्र व खादी ग्रामोद्योग मंडळ या कार्यालयामार्फत राबवणार 

बातमी शेअर करा

जळगाव : महाराष्ट्र शासनाने राज्यातील शहरी व ग्रामीण सुशिक्षीत युवक-युवतींची वाढती संख्या व उद्योग व्यवसाय क्षेत्रात राज्यात विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेवुन उद्योजकतेला  चालना देणारी सर्व समावेशक मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या नावाने महत्वाकांक्षी योजना सन २०१९ -२० पासून राज्यात जिल्हा उद्योग केंद्र व खादी ग्रामोद्योग मंडळ या कार्यालयामार्फत राबविण्यात येत आहे.

                सदर योजना कायदेशिररित्या पात्र असणारे उत्पादन व सेवा उद्योग व्यवसायासाठी आहे. सदर योजनेत कुठलेही स्थायी उत्पन्न नसलेले स्थानिक रहिवासी ज्यांचे वय १८ वर्ष पुर्ण अधिकतम मर्यादा ४५ वर्ष (अनुसुचित जाती / जमाती/ महिला / अपंग/ माजी सैनिक यांच्या साठी ५ वर्ष शिथिल ) पात्र राहतील. सदर योजनेसाठी शैक्षणिक पात्रता १)  रुपये १०.०० लाखावरील प्रकल्पासाठी ७ वी उत्तीर्ण  व  २) २५ लाखावरील प्रकल्पासाठी १० उत्तीर्ण अशी आहे. तसेच अर्जदाराने यापुर्वी शासनाच्या कोणत्याही अनुदानावर आधारीत स्वयंरोजगार योजनेचा लाभ घेतलेला नसावा

                सदर योजनेत अर्जदारांना उत्पादन व्यवसायासाठी ( उदा. बेकरी उत्पादन, पशुखादय निर्मिती, फॅब्रिकेशन इ.) रु. ५० लाख पर्यतच्या प्रकल्पासाठी अर्ज करता येईल व सेवा उद्योग व्यवसायासाठी ( उदा. सलुन, रिपेअरिंग व्यवसाय, ब्युटी पार्लर इ.) रु. १० लाखपर्यंत अर्ज करता येईल. या योजनेत अनुसुचित जाती / जमाती/ महिला/ अपंग/ माजी सैनिक या प्रवर्गातील अर्जदारा शहरी भागासाठी बँकेने मंजुर केलेल्या प्रकल्प किंमतीच्या २५ % अनुदान व ग्रामीण भागासाठी ३५ %  अनुदानासाठी पात्र असेल, त्यासाठी  त्यांना स्वगुंतवणुक ५ % करावी लागेल. उर्वरीत सर्व प्रवर्गातील अर्जदार हा शहरी भागासाठी  १५%  व ग्रामीण भागासाठी २५% अनुदानासाठी पात्र असेल. या लाभार्थ्यांना १०% स्वगुंतवणुक करावी लागेल.

                सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने maha-cmegp.gov.in वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज सादर करावा. अर्ज करताना अर्जदारास स्वत:चा फोटो, आधार कार्ड, अधिवास दाखला / शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला, मार्कशिट, पॅन कार्ड, व्यवसायाचा  प्रकल्प अहवाल, जातीचा दाखला व वेबसाईट वरुन डाउनलोड करुन पुर्ण भरलेले हमीपत्र (Undetaking form)    ही कागदपत्रे Upload  करावी लागतात.

                तरी जिल्हयातील सुशिक्षीत बेरोजगार युवक युवती ज्यांना नविन व्यवसाय सुरु करावयाचा आहे त्यांनी वरील वेबसाईटवर अर्ज करावा किंवा योजने बाबत सविस्तर माहिती घेण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र / खादी ग्रामोद्योग मंडळ, शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज समोर, रा.म.क्र. ६, जळगाव येथे कार्यालयीन कामाच्या दिवशी प्रत्यक्ष भेट दयावी, तसेच सदर योजना राबविण्यासाठी या कार्यालयाकडून कोणत्याही खाजगी व्यक्तीची नेमणुक केलेली नाही व सदर योजनेचा लाभ घेण्यात आपली खाजगी व्यक्ती कडुन फसवणुक झाल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. तरी जिल्हयातील जास्तीत जास्त अर्जदारांनी सदर योजनेत भाग घ्यावा, असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र जळगाव यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे. जिल्हा उद्योग केंद्र जळगाव चा दुरध्वनी क्र. ०२५७-२२५२८३२ असुन ई मे आयडी  didic.jalgaon@maharashtra.gov.in असा आहे.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment