खान्देश लाईव्ह | ७ नोव्हेंबर २०२२ | राज्याचे कृषीमंत्री आणि शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत खालच्या भाषेत टीका केल्याने सध्या मोठा वाद पेटला आहे. आज सिल्लोड मतदारसंघात आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे यांच्या सभा असल्याने सकाळपासूनच अब्दुल सत्तार यांचे नाव चर्चेत होते. श्रीकांत शिंदे यांच्या सभेच्यानिमित्ताने अब्दुल सत्तार यांनी सिल्लोडमध्ये मोठे शक्तीप्रदर्शन करून प्रकाशझोतात येण्याची संधी होती. मात्र, अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये सर्व वातावरणच पालटले आहे. त्यामुळे काहीवेळापूर्वी शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत असलेल्या अब्दुल सत्तार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आक्रमक पवित्र्यामुळे आता तोंड लपवायची वेळ आली आहे. अब्दुल सत्तार यांनी सोमवारी सकाळी साधारण १२ वाजता सुप्रिया सुळे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले.